पुणे -गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणे जिल्ह्याला झोडपून काढले. पुण्यात अशी पूरस्थिती निर्माण झाली की, पुणेकरांना खडकवासला धरण फुटल्याच्या वेळेची आठवण झाली. पुण्याच्या अनेक भागांत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. बोटीतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात होते. एकीकडे कोसळणारा पाऊस थांबत नव्हता आणि दुसरीकडे धरणे काठोकाठ भरल्याने धरणातून पाणी सोडले जात होते. पुढील 24 तासही पुण्याला धोक्याचा इशारा दिलेला आहे.
पुणे आणि परिसरात गेल्या 24 तासांत अनेक वर्षांत झाला नाही इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यातच पहाटेच्या सुमारास खडकवासला धरणातून कुठलीही पूर्वसूचना न देताच पाणी सोडल्याने या परिस्थितीत भरच पडली. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचून इमारती आणि घरांमध्येही पाणी शिरले. त्यानंतर शाळा -कॉलेज आणि कार्यालयांनाही सुट्टी देण्यात आली. या पावसामुळे तीन लोकांचा बळी गेला. जोरदार पावसाचा हा तडाखा मुंबई, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनाही बसला. त्यामुळे तेथील जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले. पुण्याला काल रात्रीपासूनच पावसाने झोडपायला सुरुवात केली होती. 24 तासांत पुण्यात 20 इंचाहून अधिक पाऊस पडला. या परिस्थितीत पहाटे तीन वाजताच्या सुमारास खडकवासला धरणातून कुठलीही माहिती न देता पाणी सोडण्यात आले. सुमारे 35,000 हून अधिक क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुण्यात सगळीकडे पाणीच पाणी साचले. नद्याही ओसंडून वाहू लागल्या. तर रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले. भिडे पूल, गरवारे कॉलेज वस्ती, डेक्कन, शीतला देवी मंदिर, संगम पूल, होळकर पूल, कॉर्पोरेशन परिसरात पाणी साचले. सिंहगड रस्ता परिसरातील पाच सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे या सोसायट्यांतील अनेक नागरिक अडकून पडले होते. त्यांच्या मदतीला बराच काळ कुणी फिरकले नव्हते. पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे पूल परिसरातील झेड ब्रिज येथे पाण्याची पातळी एकदम वाढली. या परिसरात अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित हलवण्यासाठी गेलेल्या अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार यांचा तिघांचा मृत्यू झाला. अभिषेक आणि आकाश हे दोघे डेक्कनवाडीचे रहिवासी होते. तर शिवा हा मूळचा नेपाळचा असून, तो त्यांच्याकडे नोकर म्हणून काम करत होता.
पुण्याच्या घाटमाथा परिसरातही जोरदार पाऊस झाला. घाटमाथ्यावर 24 तासांत 200 मिमी पावसाची नोंद झाली. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर या सगळ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ताम्हिणी घाटात 168 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लवासा येथे 453 मिलिमीटर, लोणावळा येथे 322 मिमी पाऊस कोसळला. तर पिंपरी-चिंचवडच्या चिखलीमधील घरकुल मधल्या इमारतींमध्येही पाणी शिरले आहे. सखल भागात गुडघ्याहून अधिक पाणी साठले होते. पुण्यातील पूरस्थितीनंतर प्रशासनाच्या यंत्रणा कामाला लागल्या. परंतु अनेक भागांत त्या कमी पडत असल्याचे चित्र होते. खडकवासलाचे पाणी पहाटे सोडल्यानेही नागरिक नाराज होते. कुठलीही पूर्वसूचना न देता पहाटे पाणी सोडल्याने अनेकांना घरातील, दुकानांतील सामान हलवता आले नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दुपारी पुण्यात पोहोचून त्यांनी अनेक भागांना भेट दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पूरस्थिती गंभीर आहे. मी तातडीने सर्व यंत्रणांना अलर्ट केले आहे. खडकवासला धरण हे पावणेतीन टीएमसीचे आहे. परंतु वरच्या भागातच आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे एकदम तीन टीएमसी पाणी धरणात आले. रातोरात धरणाचे पाणी सोडायच्या ऐवजी पहाटे धरणाचे पाणी सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला.जेणेकरून नागरिकांना सोयीचे व्हावे. आता केवळ दिवसा पाणी सोडायच्या सूचना दिल्या आहेत.
सगळीकडे पाऊस पडल्याने नद्या ओसंडून गेल्या आहेत. त्यामुळे शहरात पाणी साचले आहे. शिवाय शहरातील रस्त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता सलग दोन दिवसांच्या पावसामुळे संपली आहे. त्यात पुण्यात जास्त रस्ते सिमेंट काँक्रिट आणि पेव्हर
ब्लॉकचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सकाळी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. गरज पडल्यास लष्कराची मदत घेऊ, हेलिकॉप्टरचा वापर करून पुरात अडकलेल्यांना वाचवायच्या सूचना त्यांनी दिल्या.
पुण्यासारखेच चित्र आज राज्याच्या विविध भागांत पाहायला मिळाले. मुंबईतही काल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. कुर्ला रेल्वे स्थानक, कुर्ला डेपो, चेंबूर शेल कॉलनी, अंधेरी सबवे, बीकेसी, वीरा देसाई रोड, आरे कॉलनी हे भाग जलमय झाले. मुंबईतील वाहतूक सेवेवर परिणाम झाला. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरा होती. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागातही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, बैलबाजार रोड, सहजानन चौकात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. ठाणे -पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली होती. 26, 27, 28 जुलैला अशाच पद्धतीचा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस
मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा पुणे येथील हवामान खात्याने दिला आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पालघर व मुंबईच्या आसपासच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे शहरात मुसळधार ते मध्यम पाऊस पडणार असून, घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे. 28 जुलै नंतर पावसाचे प्रमाण कमी होईल.
पावसामुळे हुकलेला
12 वीचा पेपर पुन्हा घेणार
राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे थैमान सुरू असल्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोहोचू न शकलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. आज असलेला बारावीचा मराठीचा पेपर ज्या विद्यार्थ्यांचा हुंकला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचा पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
मुंबईतील पाणीकपात
सोमवारपासून मागे घेणार
शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात आता मागे घेण्यात येणार आहे. 29 जुलैपासून मुंबईतील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केला आहे.
दोन गाड्या वाहून गेल्या
पुण्यात बोपोडी पुलाखाली गाडी वाहून गेली, पिंपरी-चिंचवडला गाडी पुराच्या पाण्यात पडली. सुदैवाने स्थानिकांनी गाडीतील दोघांना वाचविले.
नागोठण्याला वेढा
रायगडच्या नागोठण्यात सतत पाऊस पडत असल्याने संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे, दुकाने, घरात पाणी शिरले, अंबा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी नागोठण्यात शिरले.