पुणे- आधुनिक आणि थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी टपाल पोस्ट ऑफिस पुण्यातील सहकारनगमध्ये उभे राहणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होईल. यापूर्वी बंगळूरूमध्ये देशातील पहिले या प्रकारचे टपाल कार्यालय बांधण्यात आले आहे. टपाल ऑफिसच्या पुणे शहर पश्चिम विभागाच्या रिपन ड्युलेट यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रिपन ड्युलेट म्हणाले की, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन टपाल कार्यालयाने गेल्या काही वर्षात उपनगरांमध्ये नवीन टपाल कार्यालये सुरू केली आहेत. या वर्षभरातही आंबेगाव, बावधन, शिजानीनगर, सहकारनगरमध्ये नवीन टपाल कार्यालये सुरू होत आहेत. यातील सहकारनगरला ४११०७२ हा नवीन पिनकोड मिळाला आहे. तिथे पोस्टाची स्वत:ची जागा असल्याने पुण्यातील पहिले थ्रीडी प्रकारातील पोस्ट ऑफिस बांधण्यात येणार आहे. या बांधणी प्रक्रियेत आधुनिक थ्रीडी प्रिटिंगचा वापर केला जाणार आहे. आधुनिक डिझाइन पद्धतीने वास्तूचा आकार निश्चित करून कमीत कमी माणसांच्या सहभागातून कमी दिवसांत ही इमारत उभारली जाणार आहे. भारतात ही संकल्पना नवीन असून बंगळुरूमध्ये गेल्या वर्षी टपाल कार्यालयाची पहिली इमारत बांधण्यात आली आहे.