पुणे – वारजे बाह्यवळण महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना महामार्गाच्या खालची माती ढासळून रस्ता खचला. यामुळे दोन अपघात होऊन दोघांनी आपले प्राण गमावले. सोमवारी संध्याकाळी टेम्पो दुभाजकावर आदळून चालक ठार झाला, तर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास वाहतूक कोंडीतून निघून एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला.
यामुळे मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत कात्रजकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान, या ठिकाणी रस्त्याची उंची २० फूट वर आहे. आता या खालचे फाउंडेशनचे काँक्रीट भरायला किमान १५ दिवस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कात्रजकडे जाणारी वाहतूक वारजेत विस्कळित होण्याची शक्यता आहे. सोमवारी, मंगळवारीही डुक्कर खिंडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी आठच्या सुमारास तर ही रांग चांदणी चौकापर्यंत गेली.