पुणे-फुलांची पणन व्यवस्था बळकट व्हावी,शेतकरी फूलशेतीकडे वळावेत, यासाठी केंद्र सरकारची शेतीमाल निर्यात मार्गदर्शन संस्था अपेडा आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्यावतीने बंगळुरूच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे फूल लिलाव बाजार सुरू करण्यात येणार आहे. यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
हे राज्यातील पहिले फूल लिलाव केंद्र असून त्याचा लाभ पुणे,सातारा,सांगली, कोल्हापूर,सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील फूल उत्पादक शेतकर्यांना होणार आहे. हा बाजार जागेवर लिलाव आणि ऑनलाईन लिलाव अशा दोन पद्धतीने चालणार आहे.त्यामुळे राज्यातील फूल उत्पादक शेतकरी, फुले खरेदी करणारे स्थानिक व्यापारी, देशातील व विदेशातील व्यापारी फुले खरेदी करू शकणार आहेत. कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले की, देशात बंगळुरूमध्ये फुलांचा मोठा बाजार आहे. गुलाब,कमळ यासह जरबेरा,निशिगंध, झेंडू या फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी बंगळुरू बाजारात आपली फुले घेऊन जातात. आता तळेगाव दाभाडे येथे फुलांचा बाजार झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांना या ठिकाणी फुले घेऊन येणे शक्य होणार आहे.