पुणे- पुण्यातील उरूळी कांचनमध्ये इनामदार वस्तीजवळ चौघांवर आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन इथे इनामदार वस्तीवर राहणाऱ्या बापू शितोळे यांच्या घरी काळूराम गोते यांच्यासोबत आणखी तीन जण गेले होते, तेव्हा बापू शितोळे आणि काळूराम गोते यांच्यात जमिनीच्या पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. या वादातूनच संतापलेल्या शितोळे यांनी चौघांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात गोते हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयामध्ये दाखल केले आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
पुण्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुण्यात नाना पेठेत वनराज आंदेकरवर गोळीबार झाला होता. गोळीबारातून वाचलेल्या आंदेकरवर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे.