पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद आठवड्यातून एक दिवस कपात

पुणे -अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहाणार आहे त्यामुळे राज्य शासनाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुणे पालिकेने खडकवासला धरण साखळीतील उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज घेत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात गुरुवार २७ एप्रिल रोजी होणार आहे.यादिवशी संपूर्ण पुणे शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणसाखळीमध्ये आजमितीला ११.७६ टीएमसी पाणीसाठा आहे. शहराला दररोज १४७० एमएलडी पाणी लागते.
त्यामुळे महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्याची तयारी केली आहे. या कालावधीत दोन बाष्पीभवन व गळतीतून २ टीएमसी पाणी खर्ची होईल व धरणांतून पुढील गावांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी सुमारे साडेतीन टीएमसी पाण्याची गरज भासेल. उर्वरीत अर्थात ६.२५ टीएमसी पाणी ३१ ऑगस्टपर्यंत वापरायचे झाल्यास महापालिकेला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवावे लागेल.

या नियोजन कामाचा भाग म्हणून पालिकेच्या पर्वती जलकेंद्र,पंपिंग,रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र एन.डी.टी. वारजे जलकेंद्र,नवीन होळकर पंपिंग,भामा-
आसखेड जलशुद्धीकरण येथील विद्युत,पंपिंगविषयक आणि स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे आहे.त्यामुळे गुरुवार २७ एप्रिल रोजी उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.या सर्व भागाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top