पुण्यात गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी

पुणे – पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी घातली असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यासोबत गणेशोत्सव काळात १२ दिवस पुणे शहरात दारूबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सादर केला आहे.पुण्यातील ५ परिमंडळमधील पोलीस उपायुक्त यांना त्यांच्या हद्दीतील प्रत्येक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधून मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यापेक्षा पारंपारिक वादनास प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. उपनगरावरून काही गणेशोत्सव मंडळे शहराच्या मध्यवर्ती भागात लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र त्यांना यावर्षी तेथे बंदी घालण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या गर्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोऱ्या दरवर्षी होत असतात. त्या रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथके तैनात केली जाणार आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याने महत्त्वपूर्ण गणेश मंडळाच्या परिसरात पोलीस गस्त वाढवण्यासोबतच संशयास्पद वस्तूंची तपासणी होणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top