पुणे – पुण्यातल्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघाताच्या घटनेनंतरही बड्या बापाच्या मुलांनी भरधाव गाडी चालवून नाही. पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर मुंबईतील वरळीतही दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका लक्ष्मीपुत्राने स्कूटरला धडक देऊन एका महिलेचा बळी घेतला होता. त्यानंतर आज आणखी एका हिट अँड रन प्रकरणात पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने भरधाव वेगात कार चालवून टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये टेम्पोचालक आणि गाडीचा क्लीनर जखमी झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन गाडी चालवताना कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक दिली. यात टेंपो ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाड हादेखील जखमी झाला आहे. पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी १६ जुलै रोजी पहाटे हा अपघात घडला. सौरभ गायकवाड हा त्याची हॅरीयर कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्याने समोरुन येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली. त्यावेळी तिथे जमलेल्या लोकांनी चालक व क्लीनर राजा शेख याला वरद लाइफ हॉस्पिटल येथे घेऊन उपचारासाठी दाखल केले. चालकाच्या कपाळावर जखम झाली असून खांद्याला मुका मार लागला होता. तर क्लीनर राजा शेख याला उजव्या चेहऱ्यावर खर्चटलेले असून उजव्या पायाच्या नडगीला जखम झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.