पुणे – पुण्यातील कोंढवा भागात दोन चिमुकल्यांसह त्यांच्या आईची चुलत दिराने हत्या करून जाळल्याचा प्रकार उघडकीस आला. संशयातून चुलत दिराने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आई आम्रपाली वाघमारे, मुलगी रोशनी आणि मुलगा आदित्य अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी दिराला ताब्यात घेतले. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला.
चुलत दीर व आम्रपाली यांच्यात प्रेम संबंध होते. ते वर्षभरापूर्वी पुण्यात रहायला आले होते. आम्रपाली यांचा विवाह झालेला होता, पण प्रेमातून त्या चुलत दिरासोबत येथे पळून आलेल्या होत्या. कोंढवा येथील पिसोळी भागात ते राहत होते. दोन मुले, आम्रपाली आणि चुलत दीर असे राहत असताना चुलत दिराला तिचे दुसऱ्याशी संबंध आहेत, असा संशय होता. त्यावरून ही घटना घडली आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान रात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने प्रथम आम्रपाली यांना ठार मारले. त्यानंतर मूल रडत असल्याने त्यांनाही मारले. त्यानंतर या तिघांना जाळले. हा प्रकार समोर येताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पसार झालेल्या दीर याचा शोध घेऊन पकडले. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.