पुणे- पुणे शहरातील गाड्यांची तोडफोड आणि कोयता गँगची दहशत सुरु असतानाच आज पहाटे वाघोली परिसरात टोळक्याने दहशत माजवण्याच्या इराद्याने अनेक गाड्या पेटवून दिल्या. याने एकच खळबळ उडाली.
माझ्या नादाला लागू नका असे म्हणत कोयते भिरकावत टोळक्याने वाघोलीतील गाड्यांची तोडफोड केली आणि त्यानंतर या गाड्यांना आग लागली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.या घटनेवरुन स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या १५ दिवसांपासून वाघोली भागात टोळक्याची दहशत आहे व पोलिसांकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. याआधी आमच्या मुलांना मारहाण करण्यात आली, गाड्या जाळल्या, मात्र पोलिसांनी लक्ष दिले नाही. आज पहाटे गाड्या जाळण्यात आल्या. उद्या आमच्या मुलांचे काही बरेवाईट झाले तर त्याला लोणीकंद पोलीसच जबाबदार असतील.