पुणे – मुसळधार पावसामुळे सभास्थानी चिखल होऊन पंतप्रधान मोदींचा रद्द झालेला पुणे दौरा आणि त्यामुळे न झालेला पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज अखेर ऑनलाईन पद्धतीने पार पडला. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतून व्हिडिओद्वारे हिरवा झेंडा दाखवून पुण्यातील सिविल कोर्ट ते स्वारगेट ही भुयारी मेट्रो रेल्वे सुरू केली. पंतप्रधानांनी या मेट्रोचे उद्घाटन न केल्याने महाविकास आघाडीने आंदोलनकरून ते करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हा मुद्दा तापला होता.
पुण्यातील मेट्रो सेवेच्या उद्घाटनाबरोबर पंतप्रधानांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भिडेवाड्यातील शाळा स्मारक, सोलापूर विमानतळ इमारत व शिंद्रा बिडकीन या ८ हजार एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्राचे भूमिपूजनही केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, पुण्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भिडेवाड्यातील शाळा स्मारकाच्या भूमिपूजनाचा मला विशेष आनंद होत आहे. स्वारगेट कात्रज व इतर मार्गांमुळे पुण्यातील वाढत्या लोकसंख्येचे जीवनमान सुलभ करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. सोलापूरच्या विमानतळामुळे जगभरातील विठ्ठलभक्तांना थेट सोलापुरात येता येणार आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्रामुळे गुंतवणूकीतून रोजगार निर्मिती करण्याचे नवे तंत्र वापरले जात आहे. या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या कंपन्या येणार असून त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. आमचे सरकार आल्यानंतर महिला सबलीकरणासाठी खरे प्रयत्न सुरु झाले. आधीच्या सरकारच्या काळात शाळेत शौचालय नसल्यामुळे मुलींना शाळा सोडाव्या लागत होत्या. आमच्या कारकिर्दीत मुली शाळेत जाऊ लागल्या. पूर्वी गरोदरपणात अनेक महिलांना नोकरी सोडावी लागत होती. भारतीय सैन्य दलात एकही महिला नव्हती. आमच्या काळात सैन्यात महिला आल्या. महिलांसाठी आम्ही विविध सेवासुविधा निर्माण केल्या.
गणेश कला क्रीडा केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही भाषणे झाली. पुण्यात वारसा व विकास यांचा समन्वय साधत विकासकामे केली जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर विरोधक दोन्ही बाजूने बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आपण महत्त्व देत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात १० लाख कोटी रुपयांची कामे झाली असून त्याच्यामुळे मेट्रो, वंदे भारत, विमानतळ, चांदणी चौक व पुणे परिवहनासाठी इलेक्ट्रीक बसेस मिळाल्या. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी स्वारगेट ते सिविल कोर्ट या मार्गावर मेट्रोने प्रवास केला.