पुणे – गेल्या वर्षी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर आरोप केला होता. पुणे शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप होता. आता याप्रकरणी राजू नंदकुमार साळुंखे याला अटक करण्यात आली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे. दरम्यान,या प्रकरणातील संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी सांगितले की,संजय राऊत यांचे पार्टनर,सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तिघेजण फरार आहेत. डॉ. हेमंत गुप्ता,संजय झा आणि संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर अशी त्यांची नावे आहेत.तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कंत्राट दिले होते. त्यावेळी तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता कारवाई तर होणारच! असे सोमय्या यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.