पुणे – अलिकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे वादात राहिलेले पुण्याचे ससून रुग्णालय आता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे नव्या वादात सापडले आहे. ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडप केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून ससून राज्यभरात चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर पोर्श कार अपघातात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससून वादात राहिले. आता कर्मचाऱ्यांच्या घोटाळ्याचे नवे प्रकरण उघड झाले आहे.
अधिकाराचा गैरवापर करीत ससूनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या ४ कोटी १८ रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार लक्षात येताच ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी या प्रकरणी रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि ७ खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
अनिल माने आणि सुलक्षणा चाबुकस्वार अशी या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत. माने हा ससून रुग्णालयात अकाउंटंट आहे. तर सुलक्षणा चाबुकस्वार ही कॅशियर आहे. ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत माने आणि चाबुकस्वार यांनी रुग्णालयातील अन्य कर्मचारी आणि काही खासगी व्यक्तींशी संगनमत करून ४ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार केला,असे वैद्यकीय संचलनालयाच्या स्तरावरील चौकशीमध्ये आढळून आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविलेल्या आरोपींमध्ये रुग्णालयातील वरीष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचा समावेश आहे.