सोलापूर – पुणे – सोलापूर महामार्गावर अरण गावच्या शिवारात दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीनजण ठार झाले. हा अपघात गुरुवारी रात्री २.३० च्या सुमारास अरण गावच्या शिवारात यशवंत हॉटेल जवळ झाला. तेजस सुरेश इंडी (२०), लिंगराज शिवनंद हळके (२४) व गणेश शरणप्पा शेरी (२३) अशी यातील मृतांची नावे होती. हे तिघेजण मित्र होते व ते भवानी पेठ सोलापूर येथील रहिवासी होते.
हे तिघे मूळचे सोलापूरचे रहिवासी असून ते सध्या पुण्यात राहत होते. ते नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाऊन कार्यक्रम आटोपून पुण्याकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.हे तिघेजण त्यांच्या मित्राच्या दुचाकीवरून पुण्याकडे निघाले होते. यावेळी ते महामार्गावरील माढा येथील अरण गावच्या शिवारात आले असता हॉटेल यशवंत कॉटेज जवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तेजस व लिंगराज जागीच ठार झाले. तर त्यांचा मित्र गणेश हा जबर जखमी झाला. त्याला सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.