पुणे – पुणे शहरात झिकाच्या रुग्णांची संख्या वाढली असून खराडी भागातील दोन गर्भवतींना झिकाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज दिली. त्यामुळे पुण्यात रुग्णांची संख्या १८ पर्यंत पोहोचली.पुणे शहरात १५ दिवसांपासून झिका विषाणूचा संसर्ग वाढत आहेत. त्यात सर्वाधिक धोका गर्भवतींना आहे. आज आढळलेल्या दोन रुग्णांत ११ आठवड्यांची गर्भवती आणि दुसरी १८ आठवड्यांची २५ वर्षांची गर्भवती आहे. या दोन्ही गर्भवतींना झिकाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. खराडीत एक रुग्ण आढळल्याने या भागात ८ गर्भवती महिलांच्या रक्तनमुन्याची तपासणी केली. त्यातून दोघींना झिकाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती देण्यात आली. पुणे शहरात झिकाच्या १८ रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी सर्वाधिक ६ रुग्ण एरंडवणे परिसरात सापडले. त्याखालोखाल पाषाण आणि खराडी परिसरात प्रत्येकी ३ रुग्ण आढळले आहेत. मुंढव्यात २, डहाणूकर कॅालनी, उजवी भुसारी कॅालनी, आंबेगाव बुद्रुक आणि कळस भागात प्रत्येकी एक रुग्ण आहे. यासर्व रुग्णांवर घरातच उपचार सुरु आहे. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
पुणे शहरात दोन गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग
