पुणे:
पुणेकरांना आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. येत्या १८ मे पासून दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ही माहिती पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन महापालिकेने पुढील काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा पाऊस कमी पडला तर अत्यावश्यक नियोजन मनपा प्रशासन करीत आहे. २० ठिकाणी एअर व्हॉल्व बसवले आहेत. त्यामुळे दुसर्या दिवशी कमी दाबाने पाणी मिळण्याची समस्या दूर होणार आहे. मुळशीमधून 5 टीएमसीची मागणी केली आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता 9.70 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराचा पाणी वापर महिन्याला 1.5 टीएमसी इतका आहे. आठवड्यातील एक दिवस याप्रमाणे महिनाभर पाणी कपात केल्यास 0.25 टीएमसी पाणी वाचणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांनी पाणी जपून वापरावे.