पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावर तळेगाव टोलनाक्याजवळ पुण्याकडून मुंबईकडे जात असलेल्या शिवशाही बसला आज सकाळी अचानक आग लागली. या बसमधून १२ प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाला आग लागल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ बस बाजूला लावून सर्व प्रवाशांना तातडीने सुरक्षितपणे बसमधून खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे या दुर्घटनेत जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल दाखल होत आग आटोक्यात आणली. आग विझल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावर शिवशाही बसला भीषण आग
