पुणे महापालिका रुग्णालयात
कोरोना लसीकरण बंदचे फलक

पुणे :

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळत आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात सद्यस्थितीत ३४६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र पुणे महापालिका रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना लस शिल्लक नसल्यामुळे लसीकरण बंद पडले आहे.

३१ मार्चपासून कोव्हीशिल्ड,कोव्हॅक्सीन कुठलीच लस उपलब्ध नसल्याने महापालिका रुग्णालयामधील लसीकरण बंद आहे. रुग्णालयात लसीकरण बंदचे फलक लावण्यात आले आहे. महापालिका रुग्णालयाकडून प्रशासनाकडे २५ हजार लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनीही याबाबत सूचना दिल्या असून आरोग्य विभागाकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. असे असतांना मात्र आता कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा शिरकाव करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top