कोल्हापूर – बेळगावहून पुण्याला निघालेल्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला.पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव ते उजळाईवाडीदरम्यान काल शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हा ‘बर्निंग बस’चा थरार घडला.या घटनेनंतर या गाडीचे चालक आणि वाहक फरार झाले आहेत.
खासगी कंपनीची ही प्रवासी बस बेळगावहून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निघाली होती. सुमारे ३० प्रवासी असलेली ही बस गोकुळ शिरगाव येथील मयूर पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर अचानक इंजिनने पेट घेतला. इंजिनला आग लागल्याचे पाहताच चालक आणि वाहकाने घटनास्थळावरुन पलायन केले. बसमधील प्रवासी गडबडीने खाली उतरले.मात्र,एक प्रवासी झोपेत असल्याने तो बसमध्येच अडकला. त्यामुळे आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला. काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. बघताबघता आगीने रौद्ररुप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह गोकुळ शिरगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. कोल्हापूर पालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.सध्या पोलीस फरार झालेल्या चालक आणि वाहकाचा शोध घेत आहेत.