पुणे-नाशिक महामार्गावर अपघात! ९ जणांचा मृत्यू!४ जण जखमी

पुणे – पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला धडक दिली. यामुळे पुढे उभ्या असलेल्या एसटी बसवर ही व्हॅन आदळली. या अपघातात या चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदतीची घोषणा केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसचा नारायणगावजवळ ब्रेक फेल झाले. त्यामुळे ती एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी मागून प्रवासी वाहतूक करणारी एक व्हॅन येत होती. त्या व्हॅनला पाठीमागून येणार्‍या एक ट्रकने धडक दिली. या व्हॅनमध्ये जवळपास १३ प्रवसी होते. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मृतामध्ये देबुबाई टाकळकर (65), विनोद रोकडे (50), युवराज वाव्हळ(23),चंद्रकांत गुंजाळ (57), गीता गवारे (45), भाऊ बडे (65), नजमा शेख (35), वशिफा इनामदार(5), मनीषा पाचरणे (56) यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top