*विविध भारती ‘एफएम’ प्रसारीत करणार
पुणे-
पुणे आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम आता थेट तुमच्या मोबाइलवर ऐकता येणार आहे. पुणे केंद्रावरून सकाळी प्रसारीत होणार्या प्रादेशिक बातम्या आणि राष्ट्रीय बातमीपत्र आता ‘ विविध भारती एफएम ‘ वरूनही प्रसारीत करण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासुन यासंदर्भात मागणी केली जात होती. ती आजपासुन पूर्णत्वास आली आहे.दररोज सकाळी ७.१० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्यांचे प्रसारण केले जाते.त्यानंतर पुन्हा सकाळी ८.१० मिनिटांनी दहा मिनिटांचे राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित केले जाते. या दोन्ही बातम्या आता मोबाईलवर ऐकता येणार आहेत.सध्या घरातील रेडिओवर मध्यम लहरी रेडिओ उपलब्ध होत नाहीत. तसेच अशा रेडिओवर खरखर जाणवत असल्याने बातम्या स्पष्टपणे कळत नाहीत,असे अनेक श्रोत्यांचे म्हणणे होते.
याच श्रोत्यांनी विविध भारती एफएम या बातम्या प्रसारीत कराव्या अशी मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन माहिती तत्कालिन प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले होते. त्याची पूर्तता आजपासून करण्यात आली आहे,अशी माहिती आकाशवाणी पुणे केंद्राचे सहाय्यक केंद्र संचालक इंद्रजित बागल यांनी दिली.विशेष म्हणजे यासाठी हेडफोन लावण्याचीही गरज नसल्याने एकाचवेळी तीन-चार जण आकाशवाणी पुणेच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकणार आहेत.तसेच रेडिओ नसल्याने आकाशवाणी पुणे केंद्रापासून दुरावलेले रसिक श्रोते पुन्हा आकाशवाणी ऐकू शकणार आहेत.