पुणे – पुणे फिल्म फाउंडेशन,सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी(मुंबई)यांच्या संयुक्त वतीने आयोजित होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा महोत्सव २० फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार असून या महोत्सवात जागतिक आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभागांमध्ये १५० हून अधिक देशी-विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना बघता येणार असल्याचे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल यांनी सांगितले.
पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स बंडगार्डन आणि सिनेपोलीस-औंध येथे ११ स्क्रीनमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा प्रख्यात कलाकार राज कपूर यांचे जन्मशताब्दी वर्ष असून ही या वर्षीची महोत्सवाची थीम असणार आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा १०७ देशांमधील १०५० हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळाने हे सर्व चित्रपट बघून त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली.आंतरराष्ट्रीय परीक्षकांमार्फत अंतिम फेरीतील १४ चित्रपटांतून सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट निवडला जाईल. त्याला ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ देण्यात येणार असून१० लाख रुपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार महोत्सवाच्या समारोपवेळी दिला जाणार आहे.