पुणे : पुणे महापालिकेमार्फत घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापूर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांकडून अनेक वर्षांपासून मागणी होत होती. आता नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुणेकरांना घरपट्टीत सवलत देण्याबाबत मंंजुरी देण्यात आली आहे. याबाबत मार्च २०२३ मध्ये अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घरपट्टी सवलतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या निर्णयामुळे पुणेकरांचा फायदा होणार आहे. पुणेकरांची अतिरिक्त करातून सुटका होणार आहे.तसेच यापूर्वी ज्यांनी कर भरला आहे, त्याची रक्कम आगामी बिलातून कमी करण्याचा निर्णय झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करताना वार्षिक भाड्यातून १०% ऐवजी १५% सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षिक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करताना ४०% सवलत देण्यास शासनाने मान्यता दिल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.