पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.शहरातील कमाल व किमान तापमानात सातत्याने बदल होत असल्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री हवेत गारवा असा अनुभव पुणेकर घेत आहे. गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३७ अंशाच्या वर गेले आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शहरासह जिल्ह्यातील थंडी गायब झाली आणि कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले. त्यामुळे दिवसभर उष्मा जाणवत आहे. आजही कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे दापोडी परिसरातील उन्हाचा पारा ३७ अंशाच्या पुढे गेला. तर कोरेगांव पार्क, शिरूर आणि मगरपट्टा परिसरात पारा ३५ अंशाच्या पुढे होता. दरम्यान, दिवसभर ऊन असले तरी रात्री हवेत गारवा आणि पहाटे विरळ धुके पडत आहे.त्यामुळे पहाटेच्या किमान तापमानातही एक ते दोन अंशाने घट झाली आहे. आज लोणावळा येथे सर्वात कमी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवेली परिसरात ११.७, शिरूर १२.२, एनडीए १२.८, शिवाजीनगर १३.८, पुरंदर १४.८, बारामती १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.