*अन्न निधीसाठी पैसे वापरणार
अबु धाबी – ‘मोस्ट नोबल नंबर्स’ या संस्थेच्या लिलावात एका कारची नंबर प्लेट ५५ दशलक्ष दिरहम म्हणजेच १२२.६ कोटी रुपयांना विकली गेली. या नंबर प्लेटचा नंबर पी ७आहे. ही जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट आहे. कोटींच्या घरात झेप घेतलेल्या या नंबर प्लेटची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. सध्या या नंबर प्लेटचे विशेष कौतुक होत आहे.मात्र, एवढी महागडी नंबर प्लेट खरेदी करणारी व्यक्ती कोण आहे, हे अद्याप कळलेले नाही.
या लिलावात आलेले कोट्यावधी रुपये चांगल्या कामासाठी वापरले जाणार आहेत. जागतिक पातळीवर उपासमारीची समस्या अजूनही पूर्णता मिटलेली नाही. त्यामुळे हे पैसे या कामासाठी वापरले जाणार आहेत. रमजानमध्ये अन्न निधी उपलब्ध करणे, हे या लिलावाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, २००८ मध्ये अबू धाबी येथे एका कारचा लिलाव करण्यात आला. या लिलावात एक नंबर प्लेट ५२.२ दशलक्ष दिरहम म्हणजे ११६.३ कोटी रुपयांना विकली गेली होती. हा विक्रम मोडण्यासाठी यंदा पी ७ क्रमांकाची बोली लावण्यात आली. त्यावर दिरहम १५ दशलक्षांपासून बोलीला सुरूवात झाली, अखेर ५५ दशलक्ष दिरहमवर ही बोली थांबली.