पुणे- नाशिकच्या सिटी लिंक कर्मचार्यांप्रमाणे पुणे परिवहनच्या पीएमपी बससेवेच्या कर्मचाऱ्यांनीही आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज संप सुरू केला. या संपामुळे पीएमपीच्या संचलनातील गाड्या कमी झाल्यामुळे पुणे शहरातील हजारो लोकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
पीएमपी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली असून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब मिळावी, ६ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती द्यावी, अशा मागण्या समितीकडून करण्यात आल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्याचा फटका शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना बसला. या संपादरम्यान जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.