मुंबई- राज्य शासनाने ‘महाज्योती’ अधिछात्रवृत्तीच्या जागा कमी केल्याने पीएचडी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.तसेच अन्य काही जाहीर केलेल्या योजना फक्त कागदावरच आहेत. त्यामुळे आपल्या रास्त मागण्यांसाठी राज्यभरातील शेकडो पीएचडी करणारे विद्यार्थ्यांनी आझाद मैदान बेमुदत आंदोलन केले सुरु आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या विद्यार्थ्यांनी आता दिवाळीलाही घरी न जाता आझाद मैदानातच काळे कंदील लावून आपली दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाज्योती अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज केलेल्या आणि आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष सद्दाम मुजावर आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.शासनाकडून महाज्योती अंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाते.वर्ष २०१९ मध्ये अर्ज केलेल्या ९५७ विद्यार्थी तर वर्ष २०२२ मध्ये १२२६ विद्यार्थी संशोधकांना फेलोशिप देण्यात आली होती. मात्र त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १ जून २०१३ च्या बैठकीत महाज्योती अधिछात्रवृत्तीसाठी केवळ ५० जागा घोषित करण्यात आल्या.त्याला राज्यभरातील विद्यार्थांनी विरोध केल्याने अखेर सरकारने जागा वाढवून २०० केल्या आहेत. तरीही या जागा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या जातींची संख्या ४१२ असून लोकसंख्येला पूरक नाहीत.
दरम्यान, महात्मा जोतिबा फुले फेलोशिप सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना मिळावी,पीएचडीसाठी नोंदणी झालेल्या तारखेपासून फेलोशिप देण्यात यावी,सारथीच्या धर्तीवर जिल्ह्यात महाज्योती संस्थेची उपकेंद्रे स्थापन करावी,अशा या पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आझाद मैदानात ‘काळी दिवाळी’
