पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या १५ दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दिवसाला २०हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत असून रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. सध्या ११९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी केवळ तीन रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल असून उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
करोना संसर्गाचा राज्यातील पहिला रुग्ण १० मार्च २०२० रोजी पिंपरी -चिंचवड शहरात आढळला होता. संपूर्ण जगात करोनाने सुमारे दोन वर्ष थैमान घातले होते. पिंपरी-चिंचवड शहरातही दोन लाखांहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी ४ हजार ६३० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. परंतु करोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग धरताच करोना आटोक्यात आला होता.