पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क परिसरात आज दुपारी भरधाव आलिशान कारने स्कूल बसला जोरदार धडक दिली. या धडकेत कार आणि बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. या घटनेत कारचालक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले.
सायन्स पार्क परिसरात स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या बसमध्ये १५ विद्यार्थी बसले होते. त्याचवेळी समोरून अचानक भरधाव आलिशान कार आली. हे बघताच बसचालकाने ब्रेक मारला. मात्र, तरीही कारचा वेग अधिक असल्याने या कारने बसला समोरून जोरदार धडक दिली. अपघातानंतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोन विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने जखमी कारचालकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी नागरिकांनी केली.