पावसाळ्यात पालिकेचे पंप बंद पडल्यास अभियंत्यावर कारवाई

मुंबई – पावसाळ्यात समुद्राला भरती असताना अतिवृष्टी होऊन सखल भागात पावसाचे पाणी कमी जास्त प्रमाणात साचते.मात्र साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने यंदा ४७७ ठिकाणी खास उपसा पंपांची व्यवस्था केली आहे. मात्र तशी परिस्थिती उद्भवल्यास जर पंप बंद असल्याचे आढळल्यास संबंधित विभागातील सहाय्यक अभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त इक्बाल सिंह आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)पी.वेलरासू यांनी दिला आहे.
यंदा मुंबई व परिसरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात एकाच दिवशी सरासरी ५५ मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडल्यास, अतिवृष्टी झाल्यास व त्याच सुमारास समुद्राला मोठी भरती असल्यास यावेळी समुद्रात अंदाजे साडेचार मिटर उंचीच्या किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळल्यास मुंबईतील सखल भागात पावसाचे पाणी कमी-जास्त प्रमाणात साचते. या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका प्रशासन अशा सखल भागाच्या ठिकाणी पंपांची व्यवस्था करते. यंदा शहर व उपनगरे ४७७ ठिकाणी असे पंप बसवले आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचनाही वरिष्ठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.सखल भागात २४ तास पंप सज्ज राहतील, हीदेखील जबाबदारी समन्वय अधिकाऱ्यांवर असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top