सोलापूर: पावसाने पाठ फिरवल्याने आता हिरवा चारा महागला आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने पूर्ण पाठ फिरविल्याने आता ऐन पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या किमती दुपटीने वाढू लागल्या आहेत. अजून काही दिवसांनी चारा मिळणेही मुश्किल होणार असल्याने आता तरी शासनाने तातडीने चार डेपो सुरू करण्याची मागणी पशुपालक करू लागले आहेत.
पंढरपूर बाजार समितीमध्ये रोज सकाळी हिरव्या चाऱ्याचा मोठा बाजार भरतो. सध्या या हिरव्या चाऱ्याच्या भावात सतत वाढ होत असून, सुरुवातीला दोन हजार रुपये टन भावाने जाणारा हिरवा चार आता पाच हजार रुपये टन भावानेही मिळणे अवघड होत आहे. यातच पाणीच मिळत नसल्याने उभा ऊस फडात जळू लागला आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी शेतातील ऊस हिरवा चार म्हणून आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या या हिरव्या उसाला साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने तो कारखान्याला देण्यापेक्षा हिरव्या चाऱ्यासाठी ऊस देण्याची शेतकऱ्यांची मानसिकता होऊ लागली आहे. शासनाला मुक्या जनावरांची दया येऊन तातडीने छावण्या सुरु केल्यास तर हे पशुधन वाचेल, अन्यथा अजून काही दिवसांनी चाऱ्याअभावी परिस्थिती खूपच भीषण बनेल, असे पशुपालक सांगत आहेत.