पालिकेच्या लिपीक भरतीतील जाचक अटींविरोधात कोर्टात जाणार

*’आप’चा इशारा
मुंबई – मुंबई महापालिकेत लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक पदासाठी मोठी भरती होणार आहे.मात्र या भरतीसाठी उमेदवारांना काही जाचक अटी घातल्या आहेत.त्या रद्द कराव्यात,
अन्यथा येत्या दोन दिवसांत या जाचक अटींविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे आणि मुंबई अध्यक्ष रुबेन मस्कर यांनी दिला आहे.

धनंजय शिंदे आणि रुबेन मस्कर यांनी सांगितले की, मुंबई पालिकेत कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील १,८४६ जागा सरळसेवेने भरल्या जाणार आहेत.मात्र बारावी तसेच पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासह अन्य जाचक अटींमुळे राज्यातील तीन ते चार लाख उमेदवार या भरतीपासून वंचित राहणार आहेत.तसेच काही विशिष्ट प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन परीक्षा नियुक्तीपासून दोन वर्षांत उत्तीर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. ती सरसकट सर्वच उमेदवारांना लागू करावी.जेणेकरून उच्चशिक्षित उमेदवारही अर्ज करू शकतील. पालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांची मुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतात, पदवी-पदव्यत्तर शिक्षण घेतात.परंतु अनुकंपा तत्त्वावर किंवा अग्रहक्काने नोकरी मिळविण्याची वेळ येते,तेव्हा विषयांकीत अटीमुळे त्यांना ‘कामगार’ पदासाठीच पात्र ठरविले जाते.म्हणजेच पदवी, पदव्युत्तर असूनही त्यांना ‘लिपिक’पदी नियुक्ती दिली जात नाही. त्यामुळे ही अट तत्काळ रद्द करावी.

विविध पदांसाठी ९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवार बारावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे.या अटींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. एमपीएससी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अशी अट कधीच नव्हती. त्यामुळे ही अट काढून टाकावी, अशी मागणी ‘आप’चे राज्य सचिव शिंदे यांनी केली आहे. या अटींविरोधात शिवसेना पक्ष नेते आदित्य ठाकरे यांनीही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दोन वेळा पत्र पाठवून पहिल्याच प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे, ही जाहिरातीतील अट रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top