मुंबई- २२ जुलैपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत असलेल्या पालिकेच्या निवासी डॉक्टरांना दिलासा देणारा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.या डॉक्टरांच्या वेतनात १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वेतनवाढ मार्चपासून असून ती ऑगस्टच्या वेतनात मिळणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी यांनी दिली.
यासंदर्भात पालिका रुग्णालयाच्या संचालक डॉ. नीलम अंद्रादे यांनी सांगितले की,पालिकेच्या निवासी डॉक्टरांना राज्य शासनाच्या नियमानुसार फायदे मिळणार आहेत.त्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या डॉक्टरांच्या उर्वरित मागण्यांची पूर्तता लवकरच होणार आहे.पोस्ट ग्रॅज्युएट निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन वाढीबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत १० हजार रूपयांची वाढ केली आहे. नायर,केईएम,सायन,कूपर आणि दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना याचा लाभ होणार आहे.त्यामुळे निवासी डॉक्टरांनी २२ जुलैचे आंदोलन मागे घ्यावे,असे आवाहन डॉ.नीलम अंद्रादे यांनी या डॉक्टरांना केले आहे.दरम्यान,पालिका प्रशासनाकडून आमच्या मागण्यांसंदर्भात लेखी उत्तर आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल,असे पालिकेच्या केईएम रुग्णालयाचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष गौरव नाईक यांनी सांगितले.