पालघर- जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी,नाले,ओहोळ भरभरून वाहू लागले आहेत.त्यामुळे पहिल्या पावसात मिळणारे चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्ये मंडळींनी नदी,ओहोळ परिसरात गर्दी करायला सुरुवात केली आहे.
पावसाळा सुरू झाला की डोंगर- दर्यातून नदीला मिळणार्या पाण्यामुळे नदीचा प्रवाह पूर्ववत होऊन माशांना ताजे पाणी मिळते. या ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होऊन प्रवाहाच्या उलट्या दिशेने तर काही प्रवाहासोबत पोहत जातात.नेमका हाच काळ माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे मासे कमी पाण्याचे क्षेत्र शोधून तिथे अंडी घालण्यासाठी येतात. कमी पाण्यात येण्याच्या प्रयत्नात मासे शेताच्या पाण्यात आणि छोट्या ओहोळात येतात. हे मासे मिळविण्यासाठी लोक छोट्या ओहोळामध्ये आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागात पागेर म्हणजेच माशांचे जाळे आणि झोलवा घेऊन मासे पकडण्याची जातात.सध्या असेच मासे पकडण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.या माशांना बाजारातही चांगली मागणी आहे. छोटे मासे ५० ते १०० वाटा तर मोठे मासे २०० ते ३०० रुपये किलो दराने विकले जात आहेत.