पालघर – जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी गाव परिसरात सध्या एक आगळावेगळा बॅनर झळकताना दिसत आहे. भाजपचे मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोटो असलेल्या या बॅनरवर ‘आपण यांना पाहिलेत का? ‘असा सवाल करण्यात आला आहे. या पालकमंत्र्यानी दाखवलेल्या असंवेदनशील वृत्तीचा निषेध म्हणून हे बॅनर लावले असल्याचे सांगितले जात आहे.
१९ एप्रिल रोजी डहाणू तालुक्यातील धानिवरी येथील प्रकल्पबाधितांना कोणताही मोबदला न देता त्यांना घराबाहेर काढून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला होता
यावेळी आदिवासी महिलांना विवस्त्र करण्यात आल्याचा आरोप झाला होता.या संतापजनक आणि निंदनीय घटनेचा देशभरात निषेध व्यक्त केला होता.त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी या गावाला भेट देऊन सरकारी यंत्रणेचा निषेध व्यक्त केला होता. तसेच इथल्या पीडितांना धीर दिला होता.
पण जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटना घडून आठवडा उलटला तरी इकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे गावातील लोकांमध्ये पालकमंत्री आणि सरकारबद्दल तीव्र संतापाची भावना दिसत आहे.
पालकमंत्र्यांनी या आदिवासी पीडितांची साधी विचारपूसही केलेली नाही. त्यामुळे हे जिल्ह्याचे गायब झालेले पालकमंत्री आहेत तरी कुठे? आपण यांना पाहिलेत का? असा सवाल या गावकर्यांनी या बॅनरच्या माध्यमातून केला आहे.