मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर गेले. त्यावेळी तिथे पोहचले असता पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारपे यांनी त्यांचे स्वागत केले आणि ते मोदींच्या पाया पडले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. राऊत म्हणतात की, पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी मोदींच्या पायाला स्पर्श केला की गुडघ्याला? तुम्ही फोटो नीट आणि निरखून पाहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासमोर आले तर त्यांना आम्हीही वाकून नमस्कार करू. ते आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांनी नमस्कार केला असेल आणि भाजपवाले डंका पिटत असतील तर त्यांना माझा नमस्कार आहे.
राऊतांनी यावेळी पापुआ न्यू गिनीचा इतिहास सांगितला आहे. ते म्हणाले की, पापुआ न्यू गिनी या देशाची लोकसंख्या ६० लाख आहे. त्या देशात ८५० भाषा आहेत. तो संपूर्ण आदिवासी भाग आहे. हा मागास भाग आहे. ज्या पंतप्रधानांनी मोदींना चरण स्पर्श केला, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होते. भ्रष्टाचार करणारे ते अर्थमंत्री होते. फरारही होते. त्यांनी चरणस्पर्श केला आनंदाची गोष्ट आहे. अंधश्रद्धा, भूतप्रेत आणि जादूटोणा यामुळे तो देश प्रसिद्ध आहे. याआधी जवाहरलाल नेहरु, लाल बाहदुर शास्त्री आणि इंदिरा गांधी हे जेव्हा परदेश दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांचे देखील चरणस्पर्श करण्यात आले होते.