कोल्हापूर – कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणातील सुनावणी शनिवारी झाली नाही. या प्रकरणातील कर्नाटकातील संशयित आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने सुनावणी पार पडली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व पोलीस कर्नाटकात मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी गेले होते. त्यामुळे संबंधित संशयित आरोपींना पोलिस बंदोबस्तात कोल्हापुरातील न्यायालयात हजर करणे शक्य झाले नाही, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. यापूर्वी झालेल्या सुनावणीत पानसरे यांचा एक्सरे व इतर वैद्यकीय कादगपत्रांचा १२४ पानांचा अहवाल सादर करण्यात आला. पंच साक्षीदार सय्यद पटेल यांची साक्ष आणि उलट तपासणी झाली. सरकारी पक्षाकडून शिवाजी राणे यांनी युक्तिवाद केला होता. आरोपींच्या बाजूने सात वकिलांनी आपले म्हणणे मांडले. बचाव पक्षाच्यावतीने ॲड. समीर पटवर्धन, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. प्रीती पाटील, ॲड. अमोघवर्ष खेमलापुरे, ॲड. डी. एम. लटके, ॲड. ए. जी. बडवे आणि ॲड. प्रवीण करोशी या सात वकिलांनी पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सुनावणीसाठी सर्व संशयित आरोपींना पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते.