पुणे- जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या शेतकर्यांनी ‘पाणी मीटर हटाव,शेतकरी बचाव’ ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत पुढील महिन्यात ११ ऑक्टोबर रोजी हे शेतकरी उपोषण आंदोलन करणार आहेत.
राज्य सरकार पूर्व हवेलीमधून जाणार्या मुळा-मुठा नदीच्या सांडपाण्यावर दहापट शुल्क आकारण्यात येणार असून पाणी मीटरद्वारे हे शुल्क शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणार आहे.या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.शासनाने घेतलेल्या निर्णयास विरोध करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी वाडेबोल्हाई येथे बावीस गावातील शेतकऱ्यांची बैठक होऊन पाणी मीटरही नको व दूषित केमिकलयुक्त मैला सांडपाण्यावर पाणीपट्टीही नको असा ठराव होऊन कार्यकरी अभियंता जलसंपदा विभाग यांना १६ नोव्हेंबर २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते. ४ महिन्यांनंतर २२ मार्च रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊनही प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. तसेच आता तर एकदा पाणीपट्टी भरलेले पाणी वापरून झाल्यावर तेच पाणी पुन्हा नदीत सोडल्यानंतर त्याच दूषित केमिकलयुक्त मैला सांडपाण्यावर दुसऱ्यांदा दहापट जलसंपदा विभाग पाणीपट्टी आकारत आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन ११ ऑक्टोबरपासून उपोषण आंदोलन करणार आहेत.