अंबरनाथ- अंबरनाथ पश्चिम येथील पटेल प्रयोशा योगीनिवास गृहसंकुलातील पाण्याच्या समस्येला त्रासलेल्या रहिवाशांनी पाणी नाही तर मत नाही, अशी भूमिका घेतली आहे. ८ वर्षांपासून पाणी समस्यांनी त्रासलेले असून प्रशासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमचे प्रश्न सुटले नसल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे.
अंबरनाथ पश्चिम भागात फुले नगर परिसरात पटेल प्रयोशा योगीनिवास हे गृहसंकुल असून तेथे १२ इमारतींत ४७० कुटुंबे वास्तव्यास आहेत. सुमारे दीड हजार लोकवस्ती असलेल्या या गृहसंकुलात ८ वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. पुरेसे पाणी येत नाही. दिवसाआड तर कधी दोन दिवसाआड नागरिकांना पाणी मिळते. ते केवळ दहा मिनिटे असते. त्यामुळे ८ वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागतो. या समस्येबाबत येथील रहिवाशांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिका, स्थानिक आमदार आणि खासदार यांनाही निवेदन दिले, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले. मात्र सर्व अजूनही पाण्याची समस्या सुटू शकली नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील रहिवाशांनी घेतला आहे. पाणी नाही तर मत नाही अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली.