ठाणे- बारवी धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच दुरुस्ती कामासाठी एमआयडीसीने उद्या शुक्रवारी २ जून रोजी पुढील २४ तासांसाठी ठाणे शहरासह जिल्ह्यातील काही अन्य शहरांचाही पाणी पुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.तरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
या कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा,किसननगर नं. २. नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी,असे पालिकेने म्हटले आहे.या पाणी कपात कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे नगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
तसेच ठाणे शहरासह मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ आणि औद्योगिक वसाहतींना होणारा पाणी पुरवठाही या कालावधीत बंद राहणार आहे.या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नियोजनानुसार १५ ऑगस्टपर्यंत पाणी साठा पुरविण्यासाठी जून महिन्यापासून दर शुक्रवारी शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.