नवी दिल्ली – यंदाच्या उन्हाळ्यात हिंदू धर्मियांमध्ये पवित्र मानली जाणारी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध अधिक सुधारण्याच्या उद्देशाने पाच वर्षांपासुन म्हणजे २०२० पासून बंद असलेली कैलास- मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर यात्रेसोबतच दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि चीनचे परराष्ट्र सचिव सुन विडोंग यांची बीजिंगमध्ये बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांतील संबंधांवर विस्तृत चर्चा झाली. या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी सुधारण्याच्या दृष्टीने पुढील वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. जून २०२० मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम वादानंतर कैलास-मानसरोवर ही यात्रा थांबविण्यात आली होती. त्याआधी मार्चमध्ये कोरोनामुळे यात्रा व दोन्ही देशांतील थेट विमानसेवा बंद केली होती. ती आता पुन्हा सुरू होणार आहे. उन्हाळ्यात हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला जाणार आहे. कैलास मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये आहे. चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. या भागात ल्हा चू आणि झोंग चू नावाच्या दोन ठिकाणांच्या मध्ये एक पर्वत आहे. येथे या पर्वताची दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते. या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे. हे ठिकाण उत्तराखंडमधील लिपुलेखपासून अवघ्या ६५ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या कैलास मानसरोवरचा मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक असते.
पाच वर्षांनंतर कैलास मानसरोवरयात्रा उन्हाळ्यात पुन्हा सुरू होणार!
