पणजी – परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी काल गुरूवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, बिलावल भुत्तो यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर सद्भावना म्हणून पाकिस्तानने ६०० भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.पाकिस्तानमधील ट्रायबल न्यूज नेटवर्कने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे.
पाकिस्तानने सागरी सीमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या ६०० भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.२०० मच्छिमारांची पहिली तुकडी १२ मे रोजी सोडली जाण्याची शक्यता आहे, तर उर्वरित ४०० मच्छिमारांना १४ मे रोजी सोडले जाण्याची शक्यता आहे. भारत – पाकिस्तान या शेजारी देशांमधील तणाव कमी करण्यासाठी या निर्णयाकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले जात आहे. दरम्यान,भारताकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दोन्ही देशांत परदेशी कैद्यांची वेळेवर सुटका करण्याबाबत कोणतीही स्पष्ट व सर्वसमावेशक यंत्रणा किंवा धोरण नाही, त्यामुळे अनेक कैदी शिक्षा पूर्ण करूनही शिक्षा भोगत आहेत. सध्या ७०५ भारतीय नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत, त्यापैकी ६५४ मच्छिमार आहेत. त्याचप्रमाणे एकूण ४३४ पाकिस्तानी भारतीयांच्या ताब्यात असून त्यापैकी ९५ मच्छिमार असल्याचे सांगण्यात येत आहे.