नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची पीछेहाट झाली असून पाकिस्तानी कांद्याला पसंती मिळत आहे. केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे भारतीय कांद्याला तोटा सहन करावा लागत असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
भारत हा कांदा निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारची धोरणे आणि अटींमुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशातच आता जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची पाकिस्तानच्या कांद्याशी स्पर्धा सुरू असून पाकिस्तानच्या कांद्याला मागणी वाढली आहे. भारतीय कांदा ५६ रुपये किलोने निर्यात होत आहे. तर पाकिस्तानच्या कांद्याची निर्यात २८ रुपये किलोने होत आहे. त्यामुळे भारताच्या तुलनेत दर कमी असल्याने जागतिक बाजारात पाकिस्तानी कांद्याला मागणी वाढली असून प्रत चांगली असूनही दर जास्त असल्याने जागतिक बाजारात भारतीय कांद्याची पिछेहाट झाली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे मागील ४ महिन्यात भारतीय कांद्याची केवळ १२ टक्के निर्यात झाली आहे. मागील वर्षात देशाची कांदा निर्यात १३ टक्क्यांनी घटल्याचेही स्पष्ट झाले आहे.