पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला! 46 ठार! सूड उगवू! तालिबानची धमकी

काबुल – पाकिस्तानने काल रात्री अफगाणिस्तानच्या सीमाभागात जोरदार हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानच्या सीमाभागातील दहशतवाद्यांना टिपण्यासाठी पाकिस्तानने हे हल्ले केल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात 46 जण ठार झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये लहान मुले व महिलांचाही समावेश आहे. पाकिस्तानने या हल्ल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नसला तरी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला असून, या हल्ल्याचा सूड उगवण्याचीही धमकी दिली आहे. त्यामुळे युक्रेन-रशिया, इस्रायल-पॅलेस्टाईनप्रमाणे भारताच्या शेजारील देशांतही युद्धजन्य परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे.
पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या बारमाल जिल्ह्यात हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 6 मुलेही जखमी झाले आहेत. एकूण सात गावांवर हे हल्ले करण्यात आले. लमाण गावातील एका कुटुंबातील 5 जणांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. पाकिस्तानच्या जेट विमानांनी मुर्ग बाजार या गावावर केलेल्या हल्ल्यात हे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या गावाजवळ तेहेरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचे तालिबानी दहशतवादी लपले असून, हल्ल्यात त्यांची काही प्रशिक्षण केंद्रेही नष्ट केल्याचा दावा काही पाकिस्तानच्या लष्करी तज्ज्ञांनी केला आहे. पाकिस्तानचे अफगाणिस्तानबरोबरच्या व्यापारी संबंधांचे विशेष प्रतिनिधी मोहम्मद सादिक यांच्या काबुल भेटीनंतर लागलीच हा हल्ला झाल्याने दोन्ही देशातील संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. हा भाग तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेच्या दहशतवाद्यांची लपण्याची जागा असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. हे दहशतवादी पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले करत असतात. शिवाय तेहरिक-ए-तालिबान ही अतिरेकी संघटना पाकिस्तानात निवडून आलेले सरकार उलथवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. त्यांच्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आल्याचे पाकिस्तानी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. पाकिस्तानने केवळ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला असून, नागरिकांवर केलेला नाही, असाही दावा करण्यात आलेला आहे. मार्च महिन्यापासून करण्यात आलेला हा दुसरा हवाई हल्ला आहे.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानी हल्ल्यात अफगाण नागरिक मृत्युमुखी पडले असून, त्यात बहुसंख्य वाजिरीस्तानातून आलेले शरणार्थी आहेत. पाकिस्तानने हे लक्षात घ्यावे की, या भ्याड हल्ल्याचे चोख उत्तर त्यांना देण्यात येईल. हा हल्ला आंतरराष्ट्रीय धोरणे व करारांच्या विरोधात आहे. काही वाद असतील तर ते चर्चेतून सोडवायला हवेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top