कराची
पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याने नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून त्यातून लुटालुटीच्या घटनाही घडत आहे. कराची येथे एका पाकिस्तानी व्यावसायिकाने करोडो रुपये खर्च करून शॉपिंग मॉल बांधला. पाकिस्तानमधील पहिला मेगा थ्रिफ्ट स्टोअर म्हणून या मॉलचा सोशल मीडियावर प्रचार करण्यात आला. लोकांना आकर्षित करण्यासाठी, मॉल व्यवस्थापनाने पहिल्या दिवशी ५० टक्क्यांपेक्षा कमी किमतीत वस्तू विक्रीची ऑफर ठेवली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. मॉल व्यवस्थापनाला ही गर्दी हाताळला आली नाही. उद्घाटन होताच नागरिकांचा एक लोंढा मॉलमध्ये घुसला आणि अर्ध्या तासात त्यांनी संपूर्ण मॉल लुटून नेला.
हा मॉल सुरू झाला तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या लोकांनी मॉलच्या दरवाज्या पुढे गर्दी केली होती. लोक मॉलमध्ये घुसण्यासाठी आतुर होते. मात्र, गर्दी जास्त असल्याने मॉलचे दरवाजे बंद करून नागरिकांना तेथेच थांबवण्यात आले. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. नागरिकांनी दरवाजे तोडत थेट मॉलमध्ये प्रवेश केला. परिणामी तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तेथील दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी लाठीमार करून प्रवेशद्वारच तोडले.
मॉल प्रशासनाने लोकांच्या या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पाकिस्तानातील लोकांना परिस्थिती समजत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये सुधारणेला वाव नसल्याचं मॉल मालकाने म्हटले.