न्यूयॉर्क- जगातील सर्वात शक्तिशाली देशांची नवी यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. मात्र पहिल्या दहा देशांच्या यादीत भारताने आपले स्थान यावेळी गमावले आहे. पहिल्या दहा क्रमांकात यापूर्वी स्थान नसलेले सौदी अरेबिया आणि इस्रायल यांना पहिल्या दहात स्थान मिळाले आहे. ते भारताच्या पुढे गेले आहेत.
या यादीत भारताला बारावे स्थान मिळाले आहे. या यादीत पूर्वी भारत पहिल्या दहा देशांत होता. गेली काही वर्षे भारत विश्वगुरू होणार असा डंका पिटला जात असतानाच या यादीत भारत पहिल्या दहा देशांतही नाही ही बाब धक्कादायक आहे.
फोर्ब्सच्या प्रतिष्ठीत वेबसाईटने ही यादी प्रसिद्ध केली असून युएस न्यूजने ती तयार केली आहे. देशाचे नेतृत्व, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध आणि शक्तिशाली सैन्याच्या या पाच महत्त्वाच्या निकषांच्या आधारे देशांची क्रमवारी निश्चित केली जाते. या यादीत अमेरिकेने पहिले स्थान मिळवले आहे. त्यानंतर चीन, रशिया, युके, जर्मनी, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जपान, सौदी अरेबिया आणि इस्रायलचा समावेश आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, चौथ्या क्रमांकाचे सेन्य आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारत या यादीत बाराव्या क्रमांकावर आहे. पूर्वी या यादीत भारताला पहिल्या 10 देशांत स्थान होते. आता भारताची जागा सौदी अरेबिया व इस्त्रायलने घेतली आहे.
हे रँकिंग मॉडेल डब्ल्यूपीपी या जागतिक मार्केटिंग कंपनीचे एक युनिट असलेल्या बीएव्ही ग्रुपने तयार केले आहे. या संशोधन पथकाचे नेतृत्व पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधील प्राध्यापक डेव्हिड रीबस्टाईन यांनी केले आहे. देशाचे नेतृत्व प्रभावी असेल तर देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत होतात. लष्करी ताकद वाढते. लोकसंख्या हाही एक प्रभावी घटक आहे. लोकसंख्या अधिक असणे फायदेशीर असते. मात्र त्यासोबतच त्याचे मानवी भांडवल, शिक्षण कौशल्य हे घटक अधिक महत्त्वाचे असतात. या सर्व घटकांचा परिणाम क्रमवारीवर होतो.
भारतात गेली दहा वर्षे भाजपाच्या नेतृत्वातील सरकार आहे.
पंतप्रधान मोदींची गणना भाजपा समर्थकांकडून जगातील ताकदवान नेत्यांमध्ये केली जाते. भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर बड्या देशांशी संबंध आहे. जी-20, ब्रिक्स आणि क्वाड या जागतिक संघटनांचा भारत सदस्य आहे. प्रचंड लोकसंख्या, लष्करी ताकद आणि आर्थिक प्रगती असूनही पहिल्या 10 देशांत भारताचा समावेश नसल्याने ही आश्चर्याची गोष्ट मानली जात आहे. फोर्ब्सची रँकिंग पद्धत भारताच्या प्रभावाचे अचूक मूल्यांकन करण्यात अयशस्वी ठरली आहे का, असाही प्रश्न तज्ज्ञ विचारत आहेत.
पहिल्या 10 शक्तिशाली देशांत भारत नाही! सौदी, इस्रायल पुढे गेले
