मुंबई – नवीन निवडून आलेल्या आमदारांची शपथविधी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र आज पहिल्याच दिवशी मविआच्या नेत्यांनी अत्यंत बालिश आंदोलन केले. ईव्हीएमला विरोध करीत निषेध म्हणून मविआच्या नेत्यांनी शपथ घेण्यास नकार दिला आणि ते सभागृहाबाहेर निघून गेले.
मविआच्या नेत्यांनी सभागृहाबाहेर पडून पत्रकारांशी बोलताना म्हटले की, आम्ही निवडून आलेले आमदार आहोत. मात्र आमचा ईव्हीएमला विरोध आहे. महायुतीला मिळालेला विजय हा जनतेचा कौल आहे की ईव्हीएमचा आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जनतेच्या मनात या निकालाबाबत संशय आहे. मविआचे नेते आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी हीच भूमिका मांडली. यानंतर मविआचे नेते उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर पोहोचले. तिथे चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांना उद्या शपथविधी करून मगच आंदोलन करण्यास सांगितले. दरम्यान, विधान भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मविआच्या बहिष्कारावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, नवीन आमदारांना शपथ घेण्यासाठी आज व उद्या हे दोनच दिवस आहेत. या आमदारांनी शपथ घेतली नाही तर नियमानुसार हे आमदार सोमवारी सभागृहात उपस्थित राहू शकणार नाहीत. ईव्हीएमबाबत विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. लोकसभेत ते जिंकले तेव्हा त्यांनी ईव्हीएमला विरोध केला नाही आणि आता पराभूत झाल्यावर ईव्हीएमला विरोध करीत आहेत. विधान भवनात कामकाज सुरू असताना उद्धव ठाकरे यांना भेटून मविआचे आमदार आले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आम्हाला सकाळी 9 वाजता शपथ घेऊ नका, असा निरोप आला होता. आता शरद पवार जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही उद्या वागू. ठाकरे गटाचे भास्कर जाधव म्हणाले की, आम्हाला उद्या शपथ घ्यावीच लागेल. उद्या शपथ घेतली नाही तर आम्हाला सभागृहात सहभागी होता येणार नाही. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही हीच भूमिका घेतली. यामुळे आजचे आंदोलन हे बालिश आहे असे लक्षात आल्यावर मविआचे आमदार उद्या शपथ ग्रहण करतील हे उघड झाले आहे.
विधान भवन फेट्यांनी नटले
आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपाने कोणतेही शक्तिप्रदर्शन केले नाही. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार यांनी भगवे फेटे घालून एकाच वेळी विधान भवन परिसरात प्रवेश केला. त्यांच्याप्रमाणेच शक्तिप्रदर्शन करीत अजित पवार आणि त्यांच्या 41 आमदारांनी गुलाबी फेटे परिधान करून एकाच वेळी विधान भवनात प्रवेश केला.
शरद पवार आज मारकडवाडीत जाणार
बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ईव्हीएमचे सत्य उघड करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावाने प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यामुळे हे गाव प्रकाशझोतात आले असून, या गावाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी उद्या शरद पवार या गावात दाखल होणार आहेत. त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरेही या गावी जाणार आहेत अशी चर्चा आहे.
‘मविआ’त पहिल्याच दिवशी फूट?
बाबरी मशीद पाडणार्यांना उबाठा गटाने पाठिंबा दिला म्हणून आम्ही मविआतून बाहेर पडत आहोत, अशी भूमिका समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज घेतली. मविआचा आदेश न मानता अबू आझमी आणि रईस शेख या दोन समाजवादी पक्षाच्या आमदारांनी आमदारकीची शपथही घेतली. त्याचबरोबर शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पाठारे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले यांनीही मविआत असूनसुद्धा मविआचा आदेश न मानता आमदारकीची शपथ घेतली. यामुळे आनंदीत झालेल्या भाजपाने ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी प्रतिक्रिया दिली. परंतु संध्याकाळी रईस शेख म्हणाले की, आम्ही अजून मविआतच आहोत. आम्हाला मविआला पुढे न्यायचे आहे. परंतु आम्ही मविआत राहणार की नाही हे येणारा काळच ठरवेल.