प्रयागराज — प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभातील पहिले अमृतस्नान आज मकरसंक्रातीच्या दिवशी पार पडले. यात साधूंच्या १३ आखाड्यांनी भाग घेतला. हे स्नान नऊ तास चालले. साधूंच्या बरोबरीने १ कोटी ७५ लाखहून अधिक भाविकांनी संगमावर अमृतस्नान केले.
आज पहाटे अमृतस्नानाला सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीतही मोठ्या संख्येने साधू आपापल्या लवाजम्यासह अमृतस्नानात सहभागी झाले. विविध आखाड्याचे नागा साधूही आपल्या मानाप्रमाणे संगमावर स्नानासाठी आले. काही साधू घोड्यांवर बसून तर काही मिरवणुकीने इथे आले. सर्वप्रथम महानिर्वाणी तसेच अटल आखाड्याच्या संतांचे स्नान झाले. त्यांच्यानंतर निरंजनी आखाडा तसेच पंच अग्नि आखाड्याच्या साधूंचे स्नान झाले. अमृत स्नानाला जाणाऱ्या नागा साधूंच्या चरणाची धुळ घेण्यासाटी भाविकांनी एकच गर्दी केली. मध्य प्रदेशच्या निवाडी संस्थानाच्या राजकुमारांनी आपल्या कुटुंबासह अमृतस्नान केले. तब्बल साडेनऊ तास हे अमृतस्नान चालले. किन्नर आखाड्याचे सदस्य आपल्या शस्त्रांसह तलवारी व इतर शस्त्रांसह सहभागी झाले होते. यावेळी भारतीयांच्या सुखसमृद्धीची कामना केल्याचे सदस्यांनी सांगितले. जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी सर्वात पहिल्यांदा अमृत स्नान केले. महाकुंभाच्या व्यवस्थेविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. अध्यात्मिक वक्त्या जया किशोरीही महाकुंभात सहभागी झाल्या होत्या. मकरसंक्रातीच्या निमित्ताने भाविकांवर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली.