मुंबई – पश्चिम रेल्वेने शुक्रवार २४ जानेवारी व शनिवारी २५ जानेवारी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूल क्रमांक २० च्या पुनर्बाधणीसाठी हा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे दोन दिवस २७७ रेल्वे फेऱ्या रद्द होणार आहेत. हा ब्लॉक रात्री ११ ते सकाळी ८.३०वाजेपर्यंत असेल. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांनादेखील याचा फटका बसणार आहे. पहिल्या ब्लॉक कालावधीत १२७ लोकल सेवा रद्द होणार असून, ६० फेऱ्या अंशतः रद्द होणार आहेत. तर दुसऱ्या ब्लॉक कालावधीत १५० सेवा रद्द आणि ९० सेवा अंशतः रद्द होणार आहेत. या कालावधीत एकूण ४ मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत.
यानुसार रात्री ११ वाजल्यानंतर चर्चगेट ते विरार या धीम्या गाड्या मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावतील आणि माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी आणि खार रोड स्थानकावर थांबणार नाही.
तसेच, विरार, भाईंदर आणि बोरिवली येथून धावणाऱ्या धीम्या गाड्या सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावतील. याशिवाय चर्चगेट ते दादर रेल्वे जलद मार्गावर धावतील, गोरेगाव आणि वांद्रे दरम्यान काही सेवा हार्बर मार्गावर चालवल्या जातील.तर, शनिवारी सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली येथून धावणाऱ्या धीम्या आणि जलद गाड्या फक्त अंधेरीपर्यंतच धावतील. या कालावधीत १२२६७ मुंबई सेंट्रल – हापा दुरांतो एक्सप्रेस व १२२२७ मुंबई सेंट्रल – इंदूर दुरांतो एक्सप्रेस शुक्रवारी आणि १२२६८ हापा – मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस व १२२८ इंदूर – मुंबई सेंट्रल दुरांतो एक्स्प्रेस शनिवारी रद्द केल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉकमुळे २७७ लोकल रद्द
