नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीरपणे इशारा दिला होता. तसेच विरोधी पक्षांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. परिणामी मविआमध्ये फूट पडण्याची शक्यता होती. त्यामुळे ही फूट टाळण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांनी राहुल गांधींशी चर्चा केली आणि आगामी निवडणुकीसाठी मविआ एकत्र राहणे किती गरजेचे आहे हे त्यांना पटवून दिले. त्यामुळे राहुल गांधी यांनी यापुढे सावरकरांच्या विरोधात बोलणार नाही असे सांगून सावरकरांवर केलेले सर्व ट्विट डिलीट केले.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या मुद्यावरून राज्यासह देशात राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीरांचा अवमान केल्याचा आरोप भाजप-शिवसेना करत आहे. महाविकास आघाडीतील उद्धव गटालाही याच मुद्यावरून भाजप-शिवसेनेने घेरले आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी ‘सावरकरांचा अवमान सहन करणार नाही’ असा इशारा मालेगावच्या सभेतून राहुल यांना दिला. यामुळे मविआ फुटेल, अशी भीती निर्माण झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मग बैठक आयोजित केली. मात्र शिवसेनेने यावर बहिष्कार टाकला. या बैठकीत शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करीत परखडपणे मत मांडले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. विरोधी पक्षांची खरी लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासोबत आहे. तेव्हा सावरकरांबद्दल बोलू नये. या बैठकीला उपस्थित नेत्यांनी ही माहिती दिली.
काँग्रेसने सोमवारी सायंकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी डिनर आयोजित केले होते. राहुल गांधी पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले. यात राष्ट्रवादी, आप, जेएमएम, डीएमके, जेडीयू, बीआरएस, आरजेडी, सीपीआई, सीपीएम, आरएसपी, नॅशनल कॉन्फ्रेंस, आईयूएमएल, एमडीएमके इत्यादीचे नेते सहभागी झाले होते. उद्धवसेना सावरकर मुद्यावरून नाराज असल्याने या बैठकीत त्यांचे खासदार सहभागी झाले नाहीत. उद्धव सेनेच्या याच नाराजीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत मांडला. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यावेळी बैठकीत सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्यांवर चर्चा करूया, असे आवाहनही शरद पवारांनी केले. शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा आदर करतो, असे म्हटले आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यापुढे सावरकर या विषयावर बोलणार नाहीत, असे सांगितले. मात्र स्वतः राहुल गांधी यांनी याबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही. कदाचित उद्या ते काही निवेदन देण्याची शक्यता आहे. मात्र आता या वादावर तूर्तास तरी पडदा पडला आहे.
पवारांनी समजावताच राहुल गांधींनी